- स्थलांतराच्या मागणीसाठी आंदोलन…
- दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्यांमुळे रहिवाशांचा आक्रोश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- वाल्हेकरवाडी परिसरातील राजयोग कॉलनीजवळ कार्यरत असलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात स्थानिक नागरिकांनी रविवारी (दि. २) एकत्र येत तीव्र आंदोलन केले. कचरा केंद्रामुळे परिसरात सतत दुर्गंधी पसरत असून अस्वच्छतेसह विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हे केंद्र तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी केली. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, कचरा वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेचा अभाव या समस्या सातत्याने जाणवत आहेत. याबाबत महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयासह ‘सारथी’ अॅपवर वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले.
आंदोलनानंतर स्थानिक प्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये कचरा संकलन केंद्र नागरी वस्तीपासून दूर हलविणे, परिसराची नियमित स्वच्छता करणे, केंद्र हटवल्यानंतर त्या जागेचे सुशोभीकरण करणे, लगतच्या ओढ्यावरील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करणे तसेच मुख्य रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर उभारणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कचरा संकलन केंद्राच्या स्थलांतराबाबत सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
या चर्चेदरम्यान नगरसेवक निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, शेखर चिंचवडे, राजेंद्र तरस आणि बापू कातळे उपस्थित होते. तसेच कल्याण पवार, गिरीश पाटील, श्रेयस ठाकरे, प्रशांत सावळे, किरण देवकर यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले.


















