न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- शहरातील अतिधोकादायक इमारती, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, हॉकर्स व्यवस्थापन आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
धोकादायक इमारतींच्या मालकांना त्वरित नोटिसा बजावून इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच आवश्यक ती पुढील कारवाई तातडीने करावी, असे आयुक्तांनी सांगितले. फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, हॉकर्स व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई आणि बांधकाम परवानग्यांची नियमित पडताळणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नाले व पाणीवाहिन्यांचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवावा, पाणी साचण्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी आणि विकास प्रकल्पांची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करून न्यायालयाच्या आदेशांची माहिती देण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले.

















