- वडिलांसह तिघांचा दुर्दैवी अंत…
- आत्महत्येपूर्वी लिहिली होती आर्थिक विवंचनेची चिठ्ठी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- पिंपरीतील मोरवाडी कॉलनी परिसरात आर्थिक विवंचनेतून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आता आणखी हृदयद्रावक ठरली आहे. या प्रकरणात आधी वडील विनोद पिल्लाई (वय ५०) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या पत्नी सिल्जा पिल्लाई (वय ४५) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई (वय १९) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्थिक विवंचना किती टोकाला जाऊ शकते, याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
संत तुकारामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली होती. प्राथमिक तपासात विनोद पिल्लाई यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये नोकरी सोडल्यानंतर कुटुंब गंभीर आर्थिक अडचणीत सापडल्याचे समोर आले आहे. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते आणि त्यानंतर मोरवाडी कॉलनीतील भाड्याच्या घरात वास्तव्यास गेले होते.
पोलिस तपासात विनोद पिल्लाई यांनी ऑनलाइन सोडियम नायट्रेट मागवल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून रासायनिक पदार्थ, कुरिअरचे पाकीट, कोळसा तसेच आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. त्या चिठ्ठीत आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले असून, या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर सिल्जा आणि पूर्णिमा यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. त्यामुळे पिल्लाई कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला.
संत तुकारामनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मृतांच्या मोबाईल फोनमधील माहिती, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची नोंद तसेच इंटरनेटवरील शोधांचा तांत्रिक तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि रासायनिक विश्लेषणाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


















