न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासासाठी प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने निगडी येथील ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात उच्चस्तरीय बैठक पार पडली. प्रारूप सुधारित विकास योजना नियोजन समिती सदस्य तथा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विकास आराखड्याच्या विविध तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी विकास योजना नियोजन समितीचे सदस्य, नगररचना विभागाचे अधिकारी, निवृत्त सहसंचालक तसेच वास्तुरचनाकार आणि पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते. नागरिकांनी विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचना सकारात्मक पद्धतीने मांडून शहराच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन अभिषेक बारणे यांनी केले.
बारणे म्हणाले, आगामी २० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन रस्ते, पाणीपुरवठा, मलनिसारण, सार्वजनिक सुविधा, ग्रीन बेल्ट, मेट्रो, बीआरटीएस, सायकल ट्रॅक, पार्किंग आणि सामाजिक सुविधांसाठी आवश्यक आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामुळे अनियंत्रित विकासाला आळा बसून शहर अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि राहण्यायोग्य होईल. सध्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सुनावण्या घेतल्या जाणार आहेत.


















