- २,२०० हून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात ‘साहित्यरत्न दौड २०२६’ उत्साहात पार पडली. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात २,२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला.
या दौडीत नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाला मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून आमदार अमित गोरखे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. “महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर हेल्थ’सारखा आरोग्यदायी उपक्रम राबविणे स्तुत्य असून, महाराष्ट्रासाठी हा आदर्श ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
आमदार अमित गोरखे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार युवकांना प्रेरणा देणारे आहेत. आरोग्य, सामाजिक समरसता आणि सकारात्मक ऊर्जा यांचा संदेश देण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली.”
या उपक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड महापालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि कलारंग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


















