- बांधकाम व्यावसायिकावर फसवणूक व धमकीचे आरोप…
- दापोडी पोलिसांकडे तक्रार, निष्पक्ष चौकशीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- भोसरी परिसरातील कौटुंबिक मिळकतीच्या विकास करारासंदर्भात आर्थिक फसवणूक, विश्वासघात तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करत विनोद अनंता धुमाळ यांनी सोमवारी पिंपरीत पत्रकार परिषद घेतली. विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत धुमाळ यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीच्या विकासासाठी दि. २२ डिसेंबर २००६ रोजी कायदेशीर दस्तऐवजांद्वारे विकास करार व कुलमुखत्यारपत्र करण्यात आले होते. या करारानुसार विकासाच्या मोबदल्यात व्यावसायिक इमारतीतील तळमजल्यावर एक दुकान आणि सुमारे ६५० चौरस फुटांचा एक सुपर बिल्ट-अप फ्लॅट चार वर्षांच्या आत देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
मात्र, करारानंतर जवळपास दोन दशके उलटूनही विकासकाम सुरू झाले नसल्याने तसेच करारातील अटींची पूर्तता न झाल्याने कुटुंबाची आर्थिक व मानसिक फसवणूक झाल्याचा आरोप धुमाळ यांनी केला. अनेक वेळा पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, मोबदला अथवा मिळकत परत मिळावी, अशी मागणी केल्यानंतर संबंधितांकडून धमक्या देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. या संदर्भात दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
“माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही. माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि तक्रारींच्या प्रती पोलिसांकडे सादर केल्या आहेत. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असे धुमाळ यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिक कुणाल चोरडिया यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. प्रतिक्रिया प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल. दापोडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत तक्रार दाखल झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले असून, पुढील कारवाई पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
ते मुळ मालक नाहीत. मुळ मालकांचे ते भाचे आहेत. सदर जागेचे मालक धुमाळ आहेत. फुगे हे मुळ मालक आहेत. माझी याउलट अॅग्रीमेंट रद्द करून पैसे परत देण्याची मागणी आहे. भाडेकरू काढून इमारत मोकळी करून दिली नाही. माझे पैसे परत द्यावेत मी एनओसी देतो. याबाबत माझीही पत्रकार परिषद घ्यायची तयारी आहे.
-दिलीप चोरडीया, बांधकाम व्यावसायिक…


















