- ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू, चालकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी येथे भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून २४ वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता प्रेमाचा चहा हॉटेलसमोर, पुणे-नाशिक महामार्गावर घडली. आयशर ट्रक (क्र. **MH-09 DF-3237**) पुण्याकडून चाकणच्या दिशेने जात असताना चालक इस्माईल रमजान अली (वय २३, रा. करोदिया चौपाटी, बंजारी, इंदूर, मध्य प्रदेश) याने वाहन भरधाव वेगाने तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविले. त्यावेळी रस्ता ओलांडत असलेल्या शांताबाई गंगाधर पांचाळ (वय ८२) आणि राजश्री अशोक पांचाळ (वय २४, दोघी रा. बालाजी नगर, मेदनकरवाडी, ता. खेड) यांना ट्रकची जोरदार धडक बसली.
या अपघातात शांताबाई पांचाळ यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर राजश्री पांचाळ या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रामचंद्र गणपती पांचाळ (वय ४३, रा. मेदनकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६, १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करीत आहेत.


















