- गळफास घेत संपवले जीवन..
- देहूच्या चिंचोलीतील प्रसंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२६) :- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर संशय घेत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याच्या आरोपावरून देहूरोड पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साहिल हनुमंत दणाणे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, झेंडेमळा, देहूगाव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी संतोष धरणे (वय १७) ही तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. आरोपी साहिल हा मयुरीशी फोनवरून बोलत होता. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविल्यानंतर तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यातून मयुरीला शारीरिक तसेच मानसिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या त्रासामुळे निर्माण झालेल्या तणावातून मयुरीने २७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० वाजता चिंचोली येथीलघराच्या किचनमध्ये साडीच्या सहाय्याने पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी मयुरीची आई योगीता संतोष धरणे (वय ३५, व्यवसाय नोकरी, रा. झेंडेमळा, हवेली) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.


















