- शबाना मणेर आणि दीपक खेडकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ११ ऑगस्ट २०२६) :- देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी योगेश काळोखे यांची, तर स्वीकृत नगरसेवकपदी शबाना मणेर आणि दीपक खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदाचा प्रियांका मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी (दि. १०) ही निवड प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नगरसेवक योगेश काळोखे यांनी उपनगराध्यक्षपदासाठी, तर शबाना मणेर आणि दीपक खेडकर यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. दुपारी दोन वाजता अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला.
उपनगराध्यक्षपदासाठी योगेश काळोखे यांचा एकमेव अर्ज असल्याने तसेच स्वीकृत नगरसेवकपदासाठी शबाना मणेर आणि दीपक खेडकर यांचेच अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी यशवंत माने यांनी मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्या उपस्थितीत योगेश काळोखे यांची उपनगराध्यक्षपदी, तर शबाना मणेर आणि दीपक खेडकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
निवड जाहीर होताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी देहू नगरपंचायतीचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक काळोखे, प्रदीप परंडवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















