- देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवली – आ. अमित गोरखे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अखंड मानवजातीला ज्ञानाचा प्रकाश दिला. त्याच ज्ञानपरंपरेतील डॉ. ज्ञानेश्वर यशवंत पाटील हे आधुनिक काळातील ज्ञानदेव होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञानाची गंगा पोहोचवली. त्यांनी उभा केलेला ज्ञानाचा विशाल वटवृक्ष काळाच्या पलीकडे असून, येणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या स्वप्नांना सावली, दिशा आणि बळ देत राहील, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले.
नेवाळे वस्ती येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुलात बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील संकुलाचे संस्थापक बी. डी. कोटकर व अभय कोटकर यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व…
आमदार गोरखे म्हणाले की, काही माणसे देहाने आपल्यातून निघून जातात; मात्र त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रवास कधीच थांबत नाही. डॉ. डी. वाय. पाटील हे अशाच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. एका संस्थेपासून सुरू केलेला त्यांचा प्रवास आज शेकडो शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला आहे.
शिक्षणाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी होती. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी संधींची दारे खुली केली. ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ त्यांच्या कार्यामुळे मिळाले, असेही गोरखे यांनी सांगितले.
ज्ञानाची ज्योत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत…
डॉ. पाटील यांच्या साधेपणा, आपुलकी आणि माणुसकीचा उल्लेख करताना गोरखे म्हणाले, “मोठेपणा पदात नसतो, तो माणसे जोडण्यात असतो.” राज्यपालपदासारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचूनही त्यांनी सामान्य माणसाशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. आपुलकी, साधेपणा आणि संवेदनशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.
डॉ. पाटील यांच्या क्रीडाप्रेमाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शिक्षणासोबत क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही महत्त्व मिळावे, हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांनी उभारलेल्या शिक्षणविश्वात ज्ञानासोबत क्रीडेलाही महत्त्वाचे स्थान मिळाले.
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विचारांचा संदर्भ देत गोरखे म्हणाले, “जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,” हा संत ज्ञानेश्वरांचा संदेश आणि डॉ. डी. वाय. पाटील यांचे जीवनकार्य यांच्यात सुंदर नाते दिसते. ज्ञानेश्वरांनी शब्दांतून ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला, तर डॉ. पाटील यांनी संस्थांच्या माध्यमातून त्या ज्ञानाची ज्योत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.
कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली…
डॉ. डी. वाय. पाटील यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे होय, असे सांगत आमदार गोरखे म्हणाले, “फोटोला हार घालणे किंवा श्रद्धांजलीचे शब्द बोलणे एवढीच खरी आदरांजली नाही. त्यांनी आपल्यासाठी एवढे केले, आता आपण समाजासाठी काय करणार, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.”
एखादा विद्यार्थी घडवणे, गरजूला मदत करणे, ज्ञानाची वाटणी करणे आणि पुढील पिढीसाठी काहीतरी निर्माण करणे, हीच डॉ. डी. वाय. पाटील साहेबांना खरी मानवंदना ठरेल. डॉ. पाटील आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांनी उभारलेल्या प्रत्येक शिक्षणसंस्थेत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांत, शिक्षकांच्या मार्गदर्शनात, डॉक्टरांच्या सेवेत आणि समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक हातात ते सदैव जिवंत राहतील, अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी संस्थेचे संस्थापक बी. डी. कोटकर, अभय कोटकर, कुस्तुभ गावडे, मंगलाताई कदम यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















