- मच्छिंद्र तापकीर यांची आयुक्तांकडे मागणी…
- अन्यथा खड्ड्यांत वृक्षारोपण करून जनआंदोलनाचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- काळेवाडी, रहाटणी, विजयनगरसह परिसरातील रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, भारत माता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपिर चौक, आदर्शनगर आणि ज्योतिबानगर या भागातील रस्त्यांची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना चालताना तसेच वाहतूक करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याचे तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे चिखलातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन या संपूर्ण भागातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.
अन्यथा खड्ड्यांत वृक्षारोपण करून जनआंदोलन…
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


















