- रमेश वाघेरे यांचा आयुक्तांना इशारा..
- टेंडर प्रक्रियेला स्थगिती न दिल्यास न्यायालयात जाणार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच परिसरात प्रस्तावित ३७५ टन क्षमतेच्या १४०० कोटी रुपयांच्या बायो-सीएनजी प्रकल्पाला रमेश नानासाहेब वाघेरे यांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप वाघेरे यांनी केला. विद्यमान टिपिंग चार्ज ८०० रुपयांवरून ३,६६१ रुपये प्रतिटन करण्यात आल्याने महापालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच १६ वर्षे ९ महिन्यांच्या कालावधीतील सुमारे १४०० कोटी रुपयांच्या खर्चावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा विषय नियमित विषयपत्रिकेऐवजी ‘टेबल विषय’ म्हणून मंजूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. टेंडर प्रक्रियेला तात्काळ स्थगिती न दिल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.


















