न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच दशकपूर्ती स्मरणिका प्रकाशन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंगळवार दि. १८ रोजी गोविंद गार्डनच्या बासुरी हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, प्रभागातील नगरसेवक विठ्ठल नाना काटे, नगरसेविका डॉ. कुंदा भिसे, तसेच उद्योजक संजय भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सामाजिक कार्यकर्ते संदेश काटे, संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. शंकरराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून तसेच मान्यवरांचे शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. सचिव सखाराम ढाकणे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कोषाध्यक्ष सुभाष पाटील यांनी आर्थिक लेखाजोखा मांडला.
यावेळी संस्थेच्या दशकपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ कलावंतांनी भजन अभंग आणि चित्रपट गीते सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शकुंतला शिंदे, भामिनी महाले आणि रवींद्र संधानशिवे यांनी केले तर विवेकानंद लिगाडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीत आणि सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


















