- पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू; विसर्ग टप्प्याटप्प्याने ३५०० क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- पवना धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी ५.३० वाजता पवना नदीपात्रात ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणातील आवक लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने ३५०० क्युसेकपर्यंत वाढविला जाण्याची शक्यता आहे. विसर्ग वाढविताना जलसंपदा विभागाकडून आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
सततच्या पावसामुळे ओढे, नाले आणि नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊन सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदीखोऱ्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांनी केले आहे.


















