न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुनावळे (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करून औषधे व इंजेक्शन देणाऱ्या व्यक्तीवर रावेत पोलिसांनी कारवाई केली. ही घटना पुनावळे येथील पांढरे वस्ती परिसरात श्रीनाथ हॉस्पिटलजवळ १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मनोहर मोरे (वय ४७) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भागवत टेटकुराम निषाद (वय ३९, रा. रावेत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना संबंधित व्यक्ती वैद्यकीय अर्हता नसताना औषधे व इंजेक्शनची विक्री तसेच रुग्णांची तपासणी करून उपचार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपीकडे वैद्यकीय पदवी अथवा आवश्यक अर्हता नसतानाही तो बेकायदेशीरपणे औषधोपचार करीत असल्याचे आढळून आले. त्याने रुग्णांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि देशमुख व पोउपनि खिळे करीत आहेत.


















