- सात जागांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी..
- सचिन काळभोर यांच्या नावाची चर्चा, उद्याच्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा रखडलेला प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या विषयावर निर्णय होणार की पुन्हा तहकूब होणार, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या सात जागांसाठी अनेक इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने पक्षांतर्गत राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याच्या तीन स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात असताना, भाजपच्या सात जागांवरील नावे अद्याप अंतिम झालेली नाहीत. त्यामुळे यापूर्वी हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. आता २० ऑगस्टच्या सभेत भाजपकडून नावे सादर होतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सचिन काळभोर यांच्या नावाची चर्चा…
भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नावाची स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. काळभोर यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी महापौर रवी भाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केल्याचे सांगितले जाते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार झाल्याची चर्चा आहे.
काळभोर यांचे नाव चर्चेत आल्याने पक्षातील विविध राजकीय समीकरणांकडे पुन्हा लक्ष गेले आहे. काळभोर आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा यापूर्वीही झाली आहे. मात्र, सध्या दोघेही भाजपमध्ये कार्यरत असल्याने स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्या निमित्ताने पक्षांतर्गत समन्वय आणि नेतृत्वाचा निर्णय याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सात जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी…
भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी पक्षातील विविध स्तरांवरील इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपापली दावेदारी मांडल्याचे चित्र आहे. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, अमर साबळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, अश्विनी जगताप यांच्यासह पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या गटांकडूनही इच्छुकांची नावे पुढे आणली जात असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे सात जागांसाठी अंतिम निवड करताना पक्षश्रेष्ठींना स्थानिक राजकीय समीकरणांचा समतोल साधावा लागणार आहे. कोणत्या भागाला आणि कोणत्या सामाजिक, राजकीय घटकाला प्रतिनिधित्व द्यायचे, याबाबतही पक्षात विचारविनिमय सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शहराध्यक्षांकडूनही पत्रव्यवहार भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावांबाबत प्रदेश नेतृत्वाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम नावे निश्चित होण्याची शक्यता असून, त्यानंतरच महानगरपालिकेतील नियुक्तीची प्रक्रिया पुढे जाणार असल्याचे मानले जात आहे.
निर्णयाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींवर…
स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागा म्हणजे केवळ पदांची विभागणी नसून आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक गटाकडून आपल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी कोणते राजकीय समीकरण साधतात, याकडे लक्ष आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या नियुक्त्यांचा निर्णय २० ऑगस्टच्या स्थायी समिती सभेत होतो का, की पक्षांतर्गत मतभेद आणि अंतिम नावांबाबतची अनिश्चितता कायम राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


















