न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑगस्ट २०२६) :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालयात यंदाचा रक्षाबंधन सण अत्यंत अनोख्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. बाजारू भेटवस्तू किंवा प्लास्टिकच्या वस्तू ऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना रोपे भेट देऊन ‘पर्यावरणपूरक रक्षाबंधन’ उत्साहात पार पाडले.
वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. हाच संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी आपल्या सोबती विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना राखी बांधली, तर विद्यार्थ्यांनी त्या बदल्यात भेटवस्तूऐवजी विविध प्रकारची औषधी व फळझाडांची रोपे भेट दिली. या रोपांचे जतन आणि संगोपन करण्याची शपथही विद्यार्थ्यांनी या वेळी घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक सौ. प्रिया बोरकर, उपशिक्षक श्री. नंदकिशोर ढोले,सौ. वनिता गायकवाड, माधुरी शेलार, सौ. मनीषा जाधव, बालवाडी शिक्षिका सौ. रेखा गायकवाड, सारिका शिंदे लिपिक दिपाली सोनवणे इत्यादी शिक्षकवृंद व सौ.जगताप कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. “केवळ एकमेकांच्या रक्षणाचा संकल्प न करता, आपल्याला जीवन देणाऱ्या निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेण्याची गरज आहे. या चिमुकल्यांनी रोपे भेट देऊन समाजोपयोगी संदेश दिला आहे,” अशा शब्दांत उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.उपस्थित पालक प्रतिनिधी श्री. श्रीकांत मुरटे यांनी विद्यालतील सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडू देऊन कार्यक्रमाचा गोडवा वाढवला.
विद्यार्थ्यांचा हा स्तुत्य उपक्रम आणि निसर्गाप्रती असलेली आपुलकी पाहून पालकवर्ग आणि स्थानिक नागरिकांमधून या कार्यक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.


















