- ज्येष्ठ नागरिकाची ८६ लाखांची फसवणूक; आठ बँक खाती सायबर गुन्ह्यासाठी वापरल्याचा पोलिसांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. जेलमध्ये असताना झालेल्या ओळखीतून सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविण्याचे नियोजन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिक असून, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे.
तपासादरम्यान फसवणुकीची पाच लाख रुपयांची रक्कम इंडसइंड बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे आढळले. हे खाते तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळगाव, पुणे) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. लातूर) याच्या सांगण्यावरून बँक खाते काढून दिल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, तेजस आणि अविनाश यांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. अविनाश हा यापूर्वी सायबर गुन्ह्यात सुमारे दीड वर्ष न्यायालयीन कोठडीत होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविल्याचा आरोप आहे. आतापर्यंत आठ बँक खाती उघडून किंवा मिळवून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच आणखी खाती उघडण्यासाठी दोन कंपन्यांच्या नावाने कार्यालय सुरू केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. अविनाश हा वैद्यकीय शिक्षण घेत असून परदेशातील साथीदारांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड पुढील तपास करीत आहेत. इतर आरोपी तसेच आर्थिक व्यवहारातील संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे.

















