- बीआरटी मार्गिकेलाही भेगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑगस्ट २०२६) :- सांगवी ते किवळे या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील रक्षक चौक येथे सुरू असलेल्या सबवेच्या कामातील निकृष्ट दर्जाचा प्रकार समोर आला आहे. नुकताच तयार करण्यात आलेला रस्ता खचल्याने तसेच रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिकेच्या स्थापत्य विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
रक्षक चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सबवेचे काम सुरू आहे. मात्र, कामादरम्यान तयार करण्यात आलेल्या मुख्य डांबरी रस्त्यासह बीआरटी मार्गिकेतील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ता खचला असून मोठ्या भेगा पडल्याचे पाहणीत निदर्शनास आले आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका अधिकारी आणि प्रकल्प सल्लागारांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती आहे. संबंधित काम अद्याप दोष दायित्व कालावधीत असल्याने दुरुस्तीचा संपूर्ण खर्च ठेकेदारालाच करावा लागणार आहे.
महापालिकेने मे. टी. अन्ड टी इन्फ्रा लि. कंपनीला निकृष्ट रस्ता केवळ वरवर दुरुस्त न करता आवश्यक तेथे पूर्णपणे नव्याने गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. निष्काळजीपणा कायम राहिल्यास पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
“रक्षक चौकातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. रस्त्याची दुरुस्ती तात्काळ आणि ठेकेदाराच्या स्वखर्चाने करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करून भविष्यात पुन्हा खड्डे पडणार नाहीत किंवा रस्ता खचणार नाही, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.”
– संध्या वाघ, कार्यकारी अभियंता…


















