- वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा नगरपंचायतीचा विचार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २७ ऑगस्ट २०२६) :- देहूगावातील मंगळवार आणि शुक्रवारच्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाजार गायरणाच्या जागेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव देहू नगरपंचायतीच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या देहूच्या मुख्य बाजारपेठेसह देहू-आळंदी रस्त्यावर आठवडे बाजार भरत असल्याने या दिवशी परिसरात मोठी गर्दी होते. बाजारासाठी स्वतंत्र वाहनतळ नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. परिणामी मुख्य कमान, परंडवाल चौक, चौदा टाळकरी कमान ते तळ्याचा माथा परिसरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागतात.
बाजाराच्या दिवशी कामगार, विद्यार्थी, वारकरी-भाविक आणि पीएमपी बसची मोठी वर्दळ असल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. वाहतूक सुरळीत ठेवताना पोलिसांचीही दमछाक होत असून नागरिकांना तासन्तास कोंडीत अडकावे लागते.
या पार्श्वभूमीवर आठवडे बाजारासाठी गायरणाच्या जागेचा पर्याय पुढे आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आगामी मासिक सभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. बाजाराचे स्थलांतर झाल्यास मुख्य रस्त्यावरील ताण कमी होऊन देहूच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


















