- डक्टमध्ये दोन कामगारांचा मृत्यू…
- वर्षभरापूर्वी याच परिसरात तिघांचा बळी; सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑगस्ट २०२६) :- निगडी प्राधिकरण परिसरात भूमिगत डक्टमध्ये काम करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी याच परिसरात अशाच प्रकारच्या दुर्घटनेत तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे सुरक्षा उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य हॉस्पिटल परिसरातील निर्मल व्हिलासमोरील भूमिगत डक्टमध्ये काम सुरू असताना एक कामगार आत अडकला. त्याच्या मदतीसाठी दुसरा कामगार डक्टमध्ये उतरला. मात्र, आत साचलेल्या विषारी वायूमुळे दोघांनाही श्वास घेण्यास त्रास झाला आणि ते बेशुद्ध पडले.
अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढून वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये मनोज बाबुराव शिंदे (२६) आणि अमोल अशोक शिंदे (19) यांचा समावेश आहे.
गतवेळीची घटना ताजी…
दरम्यान, १५ ऑगस्ट २०२५ रोजी याच परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत चेंबरमध्ये विषारी वायूमुळे तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात पुन्हा झालेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांकडून कामगारांच्या सुरक्षेबाबत पुरेशी खबरदारी घेतली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे.


















