- तंबाकू जन्य पदार्थ व सिगारेट विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर पोलिसांचा दणका; कारवाई यापुढेही सुरू राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाकूजन्य पदार्थ आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असून, एकूण १९ टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाकूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार परिमंडळ-१ मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, चिंचवडमध्ये दोन, संत तुकारामनगरमध्ये सहा, दापोडीत तीन आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाकूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या विक्रीला आळा घालण्यासाठी यापुढेही प्रभावी कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


















