- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड मध्ये पुरस्कार प्रदान – भाऊसाहेब भोईर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा २१वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे स्वरूप १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार वितरणानंतर मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे. हा सोहळा संगीतप्रेमींसाठी विनामूल्य असून, कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे, असे आवाहन भोईर यांनी केले.
श्रेया घोषाल यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीताचे शिक्षण सुरू केले. ‘देवदास’ चित्रपटातील ‘बैरी पिया’ आणि ‘डोला रे’ या गीतांमुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली. हिंदीसह मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
या पुरस्काराची सुरुवात २००२ मध्ये झाली असून, यापूर्वी लता मंगेशकर, खय्याम, बप्पी लहरी, हृदयनाथ मंगेशकर, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, सोनू निगम, सुनिधी चौहान, उदित नारायण यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांना हा सन्मान देण्यात आला आहे.


















