- व्यवहार पूर्ण न करता परवाना तिसऱ्यालाच विकला; ११ लाखांचे धनादेशही बाऊन्स…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाचा परवाना १ कोटी २० लाख रुपयांना विकण्याचे आमिष दाखवून विसारापोटी १२ लाख रुपये घेतल्यानंतर व्यवहार पूर्ण न करता परवाना तिसऱ्या व्यक्तीला विकल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यानंतर दिलेले ११ लाख रुपयांचे दोन धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाऊन्स झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात नितीन शिवाजीराव माने (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (२), ३१८ (४) तसेच भारतीय दंड विधानातील कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रायबा धनाजी बुचडे (वय ४९, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत हा व्यवहार सुरू होता. आरोपीच्या नावावर असलेले सरकारमान्य देशी दारूचे दुकान, अनुज्ञप्ती क्रमांक सीएल-२६१, हे फिर्यादी व साक्षीदारांना एक कोटी २० लाख रुपयांना विकण्याचे ठरले होते. त्यानुसार हिंजवडी येथे विसार पावती करून फिर्यादी व साक्षीदारांकडून विसारापोटी १२ लाख रुपये धनादेश व आरटीजीएसद्वारे घेण्यात आले.
मात्र, त्यानंतर ठरलेला व्यवहार पूर्ण न करता आरोपीने सदर दारू दुकानाची अनुज्ञप्ती तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. फिर्यादीने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने एक लाख रुपये यूपीआयद्वारे परत केले. उर्वरित ११ लाख रुपयांसाठी दोन पोस्ट डेटेड चेक दिले. मात्र, आरोपीच्या खात्यात जाणूनबुजून पुरेशी रक्कम न ठेवल्याने हे धनादेश बाऊन्स झाले. त्यामुळे उर्वरित ११ लाख रुपये परत न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.५४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.


















