न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने (दि. २१ जून) रोजी जागतिक योग दिन साजरा होत आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित योगाभ्यास सत्र कार्यक्रमास पिपरी चिंचवडचे प्रथम नागरिक महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार असून स्वतः योगाभ्यास करणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व विद्याप्रतिष्ठान सोसायटी अंतर्गत येणारे विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी योगाभ्यास सत्रात सहभागी होणार आहेत. योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योगाभ्यास वर्ग, भिंतीपत्रक स्पर्धा, रांगोळी, व्याख्यानमाला इ. चे आयोजन आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आले आहे.
“आपले आरोग्य सुदृढ निरोगी राहावे आणि सर्वांचा कल योग व सूर्यनमस्काराकडे वाढावा. योग विषयी जनजागृती व्हावी तसेच प्रचार व प्रसार व्हावा” या प्रमुख उद्देशाने या विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. दि २१ जून रोजी आयोजनात योगाभ्यास सत्रात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व योग दिनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुणवंत येवला यांनी केले आहे.











