- सेठिया, ओंभासेंकडे महत्त्वाच्या खात्यांची धुरा..
- ड्रेनेज, बांधकाम परवानगीसह विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांत बदल..
- वादग्रस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अभियंता विभागातील जबाबदाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नवनियुक्त शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, शहरी दळणवळण, ड्रेनेजलाइन आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तर स्थापत्य विभागासह स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा आणि पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे देण्यात आली आहे.
सेठिया यांच्या कार्यक्षेत्रात तळवडे येथील बायोडायव्हर्सिटी पार्क, संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट, पिंपरी चौकातील माता रमाई सृष्टी आणि प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान या विशेष प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला आहे.
ओंभासे यांच्याकडे भामा-आसखेड पाणी योजना, आंद्रा पाणी योजना, पवना बंद जलवाहिनी आणि निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र या महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर यांच्याकडील ड्रेनेज विभागाची जबाबदारी काढून त्यांच्याकडे बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम विभाग सोपवण्यात आला आहे. यापूर्वी हा विभाग सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे होता. सहशहर अभियंता विनय ओहोळ यांच्याकडे ड्रेनेज विभागासह पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता संध्या वाघ यांना पदोन्नती देऊन सहशहर अभियंता करण्यात आले असून, त्यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारी अभियंता आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातही बदल करण्यात आले आहेत.
वादग्रस्त क्षेत्रीय अधिकाऱ्याची बदली…
‘ह’ क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्यावर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याकडील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काढून त्यांची भूमि आणि जिंदगी विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे. संतोष कोराड यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.


















