- सजावटीदरम्यान विजेचा धक्का बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू..
- साईनाथ मित्र मंडळावर शोककळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वडगाव मावळ (दि. १० सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या देखाव्याच्या सजावटीचे काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वडगाव मावळ येथे मंगळवारी (दि. ८) सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शिवराज भागवत कडू (वय २०, रा. चांदणी चौक, वडगाव मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शिवराज हा वडगाव शहरातील साईनाथ मित्र मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होता. गणेशोत्सवासाठी मंडळाकडून यंदा बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित देखावा उभारण्यात येत आहे. या देखाव्याच्या सजावटीचे काम मंगळवारी सायंकाळी सुरू असताना शिवराज विद्युत बोर्डवरील बटण बंद करण्यासाठी गेला.
यावेळी अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो गंभीररीत्या जखमी झाला. घटनेनंतर मंडळातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या साईनाथ मित्र मंडळासह वडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.


















