- आमदार अमित गोरखेंच्या पत्राची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित ‘हरित सेतू’ प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रत्यक्ष संवाद बैठकीचे आयोजन केले आहे. आमदार अमित गोरखे यांनी याबाबत महापालिकेकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने शुक्रवार (दि. ११ सप्टेंबर) रोजी सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित केली आहे.
महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी आमदार अमित गोरखे यांना पत्र पाठवून बैठकीची माहिती दिली आहे. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील कै. मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक होणार आहे.
‘हरित सेतू’ प्रकल्पाबाबत नागरिकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका, प्रश्न आणि विविध मुद्द्यांवर प्रशासनाकडून माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित बैठकीस उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेने केली आहे.
बैठकीस महापालिका आयुक्त, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच प्रभागातील नगरसेवक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हरित सेतू प्रकल्पाबाबत नागरिकांना थेट प्रशासनासमोर आपले प्रश्न मांडण्याची संधी या बैठकीमुळे मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनाबाबत प्रशासन काय माहिती देते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


















