- सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी : आमदार महेश लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- जुन्नर तालुक्यातील कणखर आणि संघर्षशील नेतृत्व, गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आशाताई बुचके यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आशाताई बुचके यांनी आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीत सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कायम जपली. अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. कष्टकरी, गरजू आणि वंचित नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले.
जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेल्या आशाताई बुचके यांनी अनेक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व बळ दिले. त्यांच्या निधनाने जुन्नरच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणे कठीण आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले.
त्यांचे जनसेवेचे कार्य आणि संघर्षाची भूमिका पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. आशाताई बुचके यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व समर्थकांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.


















