- कुणाल आयकॉन रस्ता, कोकणे मार्ग, महादेव मंदिर परिसरासह लोंढे वस्तीतील समस्या सोडविण्यावर भर..
- क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षांसह नगरसेवकांची प्रभागात ‘व्हिजिट’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर परिसरातील विविध नागरी समस्यांचा देवगिरी (ड) क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सविता खुळे आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे, नगरसेविका कुंदाताई संजय भिसे आदी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि विविध विकासकामांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी अध्यक्षा सविता खुळे यांच्याकडे केली.
नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील महावितरण कार्यालयासमोरील रस्त्यालगत असलेल्या मोठ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला माती व झाडे वाढलेली आहेत. हा ट्रान्सफॉर्मर फूटपाथलगत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कुणाल आयकॉन रोडचे सुरू असलेले काम तसेच कोकणे मार्गाचे कामही लवकरात लवकर पूर्ण होऊन हे मार्ग नागरिकांसाठी खुले व्हावेत. लोंढे वस्तीमध्ये पावसाचे व पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याचा गंभीर प्रश्न आहे. नागरिकांना दरवर्षी या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महादेव मंदिर परिसरातील घाटाची उंची वाढविण्याचे काम, श्री दत्त मंदिर परिसर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडई येथील विविध प्रश्नांवर अध्यक्षांसाह अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी केली.
दरम्यान अध्यक्षा सविता खुळे यांनी नगरसेवकांच्या मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असं आश्वासन दिले.

















