न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- लहान मुलींवर होणारे बलात्कार, खून तसेच स्वाईन फ्लू व डेंगीच्या रोगाने शहरात घातलेले थैमान याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार-आमदारांनी आज पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांच्याबरोबर युद्धपातळीवर बैठका घेऊन आक्रमक पवित्रा घेतला.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने आज याप्रकरणी दोन्ही आयुक्तांना निवेदने देऊन तातडीने हे प्रकार थांबले पाहिजेत अशी आग्रही मागणी केली.
आज सकाळी साडेअकरा वाजता पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने धडक मारली. मागील वीस दिवसात शहरात पाच लहान मुलींवर झालेले मृत्यु या गंभीर बाबींबद्दल पोलीस आयुक्तांना जाब विचारला. पोलीस आयुक्त कार्यालय होऊनही गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली असल्याचे त्यांनी आयुक्त पद्मनाभन यांच्या निदर्शनास आणून दिले.
याप्रसंगी काय काय उपाययोजना केल्या आहेत? व कारवाईची प्रगती याबद्दल आयुक्तांनी आमदार खासदार यांना माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यावेळी उपस्थित होते.
यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. शहरात स्वाईन फ्लू व डेंगीच्या प्रार्दूभावाने कळस गाठला असून पालिकेचे रूग्णालये या रोगांच्या प्रादुर्भावाने हाऊसफुल झाल्याची बाब त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
स्वाईन फ्लूच्या लसींचा तुटवडा, जनजागृतीसाठी काय तयारी चालू आहे? याची माहिती आयुक्तांनी दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यावेळी उपस्थित होते.