- पं. नरेंद्र मोदीजींच्या ‘ड्रीम इंडिया, विकसित भारत’च्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी रंगविले भारताचे भविष्य..
- चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. चित्रकला आणि वक्तृत्वासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना, विचार आणि भारताच्या भविष्यासंदर्भातील स्वप्ने व्यक्त करण्याची संधी मिळते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘ड्रीम इंडिया’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्रे आणि मांडलेले विचार निश्चितच त्यांच्या कल्पकतेची ओळख करून देणारे आहेत, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप यांनी केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे व शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीप विठ्ठल काटे यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर्स पब्लिक स्कूलमध्ये नुकतेच चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आ. जगताप बोलत होते. कार्यक्रमास आमदार शंकरशेठ जगताप, नगरसेविका अनिताताई काटे, चॅलेंजर्स पब्लिक स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे, भाजपचे रहाटणी-पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, महिला मोर्चा उपाध्यक्षा कल्पना बागुल, ओबीसी मोर्चा अध्यक्षा दिपाली नेवासे, अशोक वाडकर, चॅलेंजर्स पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ज्योतिका मलकानी आणि पिंपळे सौदागर परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे म्हणाल्या, ‘ड्रीम इंडिया, विकसित भारत’ तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भातील विविध संकल्पना आणि विचार विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून अत्यंत कल्पकतेने साकारले. विविध रंगांचा वापर, भारताच्या प्रगतीची स्वप्ने आणि देशाच्या भविष्यासंदर्भातील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रांमधून मांडल्या. वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत आपले विचार मांडले तसेच नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
अध्यक्ष संदीप काटे यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला, विचारांना आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या निरागस मनातून उमटलेले विचार आणि त्यांच्या कल्पकतेतून साकारलेली चित्रे यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली, असं सांगीतले.
दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या, शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.


















