न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौक, राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारी (वर्ल्ड पार्क) गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक शौचालय बंद असल्याने नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांनी तोंडावर हात ठेवून मूक निषेध नोंदवला. शौचालय दोन दिवसांत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या प्रश्नाची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई संजय भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित ठेकेदार सुबोध ठाकूर यांना जाब विचारला. दोन वर्षांपासून शौचालय बंद असून, कधी पाणी तर कधी वीजेचे कारण दिले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. शौचालय परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सार्वजनिक सुविधेची दुरवस्था झाली आहे. शौचालयाच्या इमारतीतील गाळ्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. ई-सेवा केंद्रासाठी असलेल्या गाळ्यात पंचर काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असं आश्वासन कुंदाताई भिसे यांनी यावेळी नागरिकांना दिले.


















