- मनमोहक आरास, आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी..
- पिंपळे सौदागरमधील गणेशोत्सवाचे ठरतेय प्रमुख आकर्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- श्री गणरायाच्या आगमनानिमित्त पिंपळे सौदागर येथील क्रांती क्रीडा मंडळाने यंदा भव्य आणि आकर्षक फुलांची सजावट साकारली आहे. असंख्य रंगीबेरंगी फुलांनी तयार करण्यात आलेली मनमोहक आरास, आकर्षक रोषणाई आणि भक्तिमय वातावरण यामुळे मंडळाची सजावट गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात क्रांती क्रीडा मंडळाची ही फुलांची सजावट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या परिसरात विविध रंगांच्या फुलांचा कलात्मक पद्धतीने वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांची आरास आणि त्याला जोड देणारी विद्युत रोषणाई यामुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सजावटीचा आनंद घेता यावा, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील फुलांच्या भव्य सजावटीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी क्रांती क्रीडा मंडळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी आपल्या परिवारासह, मित्रपरिवारासह आणि आप्तेष्टांसह मंडळाला आवर्जून भेट देऊन गणरायाचे दर्शन घ्यावे आणि आकर्षक फुलांची आरास पाहावी, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.


















