- ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या उभारणीचे अण्णांकडून कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.
आमदार महेश लांडगे यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून घनिष्ठ स्नेहाचे संबंध आहेत. वस्ताद किसनराव लांडगे हे अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धी येथे अनेकदा जात असल्याने लांडगे आणि हजारे कुटुंबीयांमधील जिव्हाळ्याला या भेटीत उजाळा मिळाला.
पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ उभारण्याच्या प्रकल्पाची माहिती आमदार लांडगे यांनी अण्णांना दिली. या स्मारकाच्या उभारणीचे अण्णा हजारे यांनी विशेष कौतुक केले.
“अण्णांचे मार्गदर्शन लोकहितासाठी अधिक समर्पितपणे काम करण्याची नवी ऊर्जा देते,” अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.


















