न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- भोसरी एमआयडीसीतील फुलेनगर येथील बांधकाम साइटवर इलेक्ट्रिक मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सी.बी.एन.जे. इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीच्या फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथील बांधकाम साइटवर ही घटना घडली.
याप्रकरणी नीरज शिवप्रसाद अदिवासी (कोल) यांनी तक्रार दिली आहे. मृत कामगाराचे नाव सूरज शिवप्रसाद अदिवासी (वय २५) असे आहे.
तक्रारीनुसार, सूरज हा बांधकाम साइटवरील खड्ड्यामध्ये इलेक्ट्रिक पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी खड्ड्यामध्ये उतरला होता. त्यावेळी त्याने आवाज देण्यापूर्वीच आरोपी राधेश्याम ऊर्फ उमाशंकर रामकरण अदिवासी याने निष्काळजीपणे इलेक्ट्रिक मोटार सुरू केली. त्यामुळे सूरज याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोसरी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


















