न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- गाडीला लावलेली सिल्व्हर टिकली काढण्यावरून झालेल्या वादातून एका कामगाराला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केल्याची घटना चिखली येथील टाटा मोटर्स कंपनीच्या कार लॉट पेंट शॉपमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता टाटा मोटर्स कंपनीच्या कार प्लांट पेंट शॉपमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी गौरव दिलीप भिवटे (वय २१, आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी ओमकार शिंदे (वय १९, रा.मोरेवस्ती, चिखली) हा तक्रारदारासोबत काम करतो. आरोपीने तक्रारदाराच्या गाडीला लावलेली सिल्व्हर टिकली खोडसाळपणातून काढत असल्याने तक्रारदाराची गाडी कव्हर होत नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने आरोपी बाबत सीनियर लाईनमनकडे तक्रार केली. त्यावेळी आरोपी हातात लोखंडी पाइप घेऊन आला. तक्रार का करतोस, असे म्हणत त्याने तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याच्या वर लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


















