न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- डिलिव्हरी कंपनीतून कामावरून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने कंपनीतील कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सुदवडी येथीलएका कंपनीतील चहाच्या टपरीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी आदेश दुबे (वय २६, व्यवसाय नोकरी, कंपनी एच.आर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी राजा ऊर्फ मोहम्मद नैयर मंसुरी (वय अंदाजे २६) हा कंपनीमध्ये पूर्वी अॅम्ब्युलन्स चालक म्हणून काम करत होता. तो कंपनीत विनापरवाना प्रवेश करून आला. कंपनीतून काढून टाकल्याचा राग मनात धरून त्याने तक्रारदारास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल काढून त्यांच्यावर रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


















