- थोडक्यात अनर्थ टळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- पिंपरीतील वैभवनगर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सजावटीचा भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. मात्र, घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी वेळीच परिस्थिती ओळखून घेतलेल्या खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळली.
गणेश विसर्जनासाठी मिरवणूक पवनेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गणपतीच्या ट्रॉलीवरील मागील बाजूची सजावट अचानक हलू लागली. सजावटीचा भाग कोसळण्याची शक्यता लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ मागून येणारी वाहने थांबवली. तसेच रस्त्यावरील पादचारी आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले.
पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित केल्यानंतर काही क्षणांतच सजावटीचा मागील भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे संभाव्य जीवितहानी तसेच वाहनांचे नुकसान टळले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने रस्त्यावर पडलेले सजावटीचे साहित्य बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गणपतीची ट्रॉली पिंपरी भाजी मंडई येथील लाल बहादूर शास्त्री मंडळाची होती. तर ट्रॉलीवरील सजावटीचे काम ए. टी. डेकोरेशन यांच्याकडून करण्यात आले होते. वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मिरवणुकीदरम्यान होणारा संभाव्य मोठा अपघात टळल्याचे दिसून आले.


















