- भाविकांनी शुक्रवारी सायंकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत सोहळ्याचा अनुभव घ्यावा..
- वनदेव आनंदवन मित्र मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त थेरगावातील भाविकांना यंदा श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाहसोहळ्याचा भव्य पौराणिक जीवंत देखावा अनुभवता येणार आहे. वनदेव आनंदवन मित्र मंडळ, थेरगाव यांच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे संस्थापक तथा पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्थापन केलेल्या वनदेव आनंदवन मित्र मंडळाच्या वतीने हा भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २५ सप्टेंबर) सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. कै. मोरु महादू बारणे क्रीडांगण, वनदेव नगर, आनंदवन सोसायटी, थेरगाव येथे काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाहसोहळ्याचा पौराणिक जीवंत देखावा सादर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात नागरिकांना धार्मिक परंपरा, पौराणिक कथानक आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने या देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी हा सोहळा गणेश विसर्जनाच्या उत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे. या भक्तिमय सोहळ्यास प्रभागातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब सहभागी होऊन देखाव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले आहे.
गणेश विसर्जन सोहळ्यात विशेष आकर्षण..
वनदेव आनंदवन मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य पारंपरिक गणेश विसर्जन सोहळ्यात भाविकांना भक्ती, परंपरा, संस्कृती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे. या सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहलता माघाडे, प्रियांका जाधव, पौर्णिमा डे आणि उर्मिला कानेटकर यांची विशेष उपस्थिती राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाचे आकर्षण वाढणार आहे. या भक्तिमय आणि सांस्कृतिक सोहळ्यास भाविकांनी तसेच नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


















