न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण फुगेवाडी गावाचे क्षेत्र दाट लोकवस्तीचे क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज वाखारे यांनी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील फुगेवाडी विकासापासून वंचित राहिली आहे. फुगेवाडीच्या पुढील बाजूस जुना मुंबई-पुणे हायवे, मेट्रो प्रकल्प, बीआरटी प्रकल्प यामुळे झालेले रोड बायडिंग तसेच मागील बाजूस भारतीय रेल्वे यामुळे फुगेवाडीच्या विस्तारास खूपच कमी वाव आहे. त्यामुळे या भागातील लोकांच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे या निवेदनात वाखारे यांनी म्हटले आहे.
आ. चाबुकस्वार यांनी महापालिका प्रशासनबरोबर लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करून, त्यांना फुगेवाडी गावाचा दाट लोकवस्तीत समावेश करण्याच्या सूचना करण्यात येतील, असे सांगितले.











