- एसीबीची फूड कोर्टमध्ये कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि. १७ नोव्हेंबर २०२६) :- लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. नाथा रामकिशन केकाण (वय ३८, रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ३३ वर्षीय व्यक्तीविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात गुन्ह्याची कलमे कमी करणे आणि जामीन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात संबंधित अधिकाऱ्याने १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
याशिवाय, आरोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी करून सापळा रचला.
सोमवारी (दि. १६) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास लोणावळा फूड कोर्ट येथे पोलिस उपनिरीक्षक केकाण यांना २० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

















