- उपग्रह आणि ड्रोनद्वारे बांधकामांवर ठेवणार वॉच..
- अनधिकृत मजले, वाढीव बांधकाम आणि अतिक्रमणांची होणार पोलखोल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १६ नोव्हेंबर २०२६) :- बांधकाम परवानगी घेताना दाखवायचे वेगळे आणि प्रत्यक्षात उभारायचे वेगळेच! मंजूर नकाशाला बगल देऊन वाढीव मजले, अतिरिक्त बांधकाम किंवा वापरात बदल करणाऱ्यांची आता खैर नाही. अशा नियमबाह्य बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) थेट आकाशातून नजर ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
उपग्रह आणि ड्रोनच्या माध्यमातून एखाद्या परिसराची वेगवेगळ्या कालावधीतील छायाचित्रे घेतली जाणार आहेत. जुन्या आणि नव्या छायाचित्रांची तुलना करून नव्याने उभारलेल्या इमारती, वाढीव बांधकाम क्षेत्र तसेच जमिनीच्या वापरातील बदल शोधले जाणार आहेत.
विशेष म्हणजे, एखाद्या इमारतीला किती मजल्यांची परवानगी दिली आणि प्रत्यक्षात किती मजले उभारले, याचीही पडताळणी करता येणार आहे. संशयास्पद बांधकामांची यादी तयार करून ती मंजूर बांधकाम नकाशे आणि परवानगीच्या नोंदींशी तपासली जाणार आहे.
केवळ खासगी बांधकामेच नव्हे, तर शासकीय जमिनी, रस्ते, आरक्षित भूखंड आणि प्रतिबंधित क्षेत्रांवरील संभाव्य अतिक्रमणांवरही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे.
संशयास्पद बांधकाम आढळल्यास पाहणी, नोटीस, संबंधितांचे उत्तर, पुनर्तपासणी आणि पुढील कारवाई यांची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवण्याची सुविधा प्रस्तावित आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा खरा फायदा ते प्रत्यक्ष अंमलबजावणीत किती प्रभावी ठरते, यावर अवलंबून असेल. वर्षानुवर्षे नियमबाह्य बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांना आता ड्रोनच्या नजरेतूनही सुटता येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

















