- भोसरी आणि सांगवी परिसरात कारवाई; चार लोखंडी कोयते जप्त, अल्पवयीन मुलांचाही समावेश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ नोहेंबर २०२६) :- शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, चार लोखंडी कोयते जप्त केले आहेत. या कारवाईत अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गाड्यांच्या आडोशाला मैदानाजवळ एका व्यक्तीकडे बेकायदेशीररीत्या लोखंडी कोयता आढळून आला. गुलाब सोनवा आव्हाड (वय ३८, रा. भोसरी) याच्याकडून सुमारे २०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला.
दरम्यान, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ नोव्हेंबर रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठाजवळ, औंध जिल्हा रुग्णालय परिसरात तसेच पिंपळे गुरव येथील शिवरामनगर परिसरात पोलिसांनी धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईत आकाश अशोक शिंदे, अनिकेत संजय आल्हाट आणि सिकंदर कुमार नाडगिरी यांच्यासह विधिसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
संबंधित आरोपींकडे प्रत्येकी एक लोखंडी कोयता आढळून आला. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास बंदी असतानाही आरोपींनी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या चारही प्रकरणांत भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.


















