- आळंदीतील संयुक्त बैठकीत निर्णय..
- डॉ. बाबा कांबळे यांची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ नोव्हेंबर २०२६) :- महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. आळंदी येथे झालेल्या राज्यव्यापी संयुक्त बैठकीत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी संपाची घोषणा केली.
आळंदीतील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत झालेल्या बैठकीत मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, अकोला, चंद्रपूरसह विविध जिल्ह्यांतील संघटनांचे पदाधिकारी आणि चालक-मालक सहभागी झाले होते.
या बैठकीत अनधिकृत बाइक टॅक्सी सेवांवर बंदी घालणे, संबंधित ऑनलाइन ॲप कंपन्यांवर कारवाई करणे आणि घोषित ऑटोरिक्षा-टॅक्सी-कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची प्रत्यक्ष स्थापना करून अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय परवाना नूतनीकरण, फिटनेस तपासणीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी आणि सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
प्रशासकीय अनास्था आणि ऑनलाइन कंपन्यांच्या मनमानीमुळे चालक आर्थिक संकटात असल्याचा आरोप संघटनांनी केला. या मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात संप यशस्वी करण्यासाठी सर्व चालक-मालकांना सहभागी होण्याचे आवाहन डॉ. बाबा कांबळे यांनी केले.

















