- पण नियतीने हिरावले आयुष्य!
- रेश्मा मांढरे, दीर ओंकार आणि चार वर्षांच्या देवांशचा अपघातात दुर्दैवी मृत्यू..
- नऱ्हे परिसरासह शोरूममधील सहकाऱ्यांवर शोककळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नऱ्हे, पुणे (दि. १६ नोव्हेंबर २०२६) :- कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या मांढरे कुटुंबावर काळाने घाला घातला. बेळगाव जिल्ह्यातील मल्लादिन्नी क्रॉस (ता. गोकाक) येथे रविवारी मोटार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रेश्मा श्रीकांत मांढरे (वय ३२), ओंकार चंद्रशेखर मांढरे (वय २८) आणि चार वर्षांचा चिमुकला देवांश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पुण्यातील नऱ्हे परिसरासह त्यांच्या कार्यस्थळावरही शोककळा पसरली आहे.
नऱ्हे येथील अंबाईमाता मंदिर रस्त्यालगत असलेल्या ‘अरिहंत अंगण’ सोसायटीत मांढरे कुटुंब वास्तव्यास आहे. या अपघातात वंदना चंद्रशेखर मांढरे (वय ५६), श्रीकांत चंद्रशेखर मांढरे (वय ३४) आणि हर्षदा ओंकार मांढरे (वय २६) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेतील रेश्मा मांढरे यांचे ‘सिद्धार्थ आणि कंपनी’ या शोरूमशी गेल्या १० ते १५ वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते होते. त्या सुरुवातीपासूनच शोरूममध्ये कार्यरत होत्या. चार-पाच वर्षांपूर्वी मुलगा देवांशच्या जन्मानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने काम सुरू ठेवले होते. कामातील प्रामाणिकपणा, काटेकोरपणा आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे त्या सर्वांच्या परिचित होत्या.
अलीकडेच देवांश प्लेग्रुपमध्ये जाऊ लागल्याने रेश्मा यांनी पुन्हा प्रत्यक्ष शोरूममध्ये कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. ‘मंगळवारपासून मी पुन्हा शोरूममध्ये जॉईन होते,’ असे हसतमुखाने सांगून त्या गेल्या होत्या. मात्र, त्यांचा हा निरोप अखेरचा ठरेल, याची कल्पनाही त्यांच्या सहकाऱ्यांना नव्हती.
रेश्मा यांच्या भावाकडून अपघाताची माहिती मिळताच ‘सिद्धार्थ आणि कंपनी’चे प्रमुख भरत जैन यांना मोठा धक्का बसला. गेल्या १० ते १५ वर्षांपासून रेश्मा आमच्या परिवाराचाच एक भाग होत्या. त्यांचा प्रामाणिकपणा आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे संपूर्ण स्टाफशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मंगळवारपासून त्या पुन्हा शोरूममध्ये येणार होत्या; मात्र नियतीने आमच्यावर हा आघात केला, अशा भावना भरत जैन यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, ओंकार मांढरे हे टुरिस्ट वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कष्टाळू ओंकार आणि हसऱ्या-खेळत्या देवांशच्या जाण्याने अरिहंत अंगण सोसायटीतील शेजारी, मित्रपरिवार आणि परिचितांनाही मोठा धक्का बसला आहे.
शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका स्मिता वस्ते यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी संपर्क साधला. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एकमेकांशी आपुलकीने जोडलेले मांढरे कुटुंब या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झाले असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

















