- भोसरीतील हजारो मतदारांचे पत्ते परस्पर बदलल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील गंभीर घोळ अखेर निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात अनेक मतदारांचे पत्ते त्यांच्या संमतीशिवाय बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. भोसरीत वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अंबरनाथ येथील मतदार यादीत समाविष्ट झाल्याचा आरोप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तत्कालीन उमेदवार अजित गव्हाणे यांनी या प्रकरणी पुराव्यांसह निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आठ ठिकाणांहून अहवाल मागवण्यात आले. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून सुमारे ४० मतदारांचे पत्ते बदलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने पोलिसांकडे तक्रार केली असून, स्वतःही चौकशी सुरू केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना गव्हाणे म्हणाले की, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ६८ मतदारांची नावे आणि पुरावे दिले होते. मात्र, कारवाईला झालेल्या विलंबामुळे मतदार मतदानापासून वंचित राहिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पत्ते बदलण्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मतदानाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप असून, पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















