- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा सकारात्मक निर्णय..
- ६६५ आशा स्वयंसेविकांना ७ ते १५ हजार रुपये मिळण्याची अपेक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ नोव्हेंबर २०२६) :- घराघरांत आरोग्यसेवेचा संदेश पोहोचविणाऱ्या आशा स्वयंसेविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांच्या कामाची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक ठराव केला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू असून, येत्या दोन दिवसांत अधिकृत आदेश काढून अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात एक गटप्रवर्तक आणि ६६५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. लसीकरण, डेंग्यू सर्वेक्षण, गरोदर व स्तनदा मातांची काळजी, संसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण, क्षयरोग व कुष्ठरोग रुग्णांचा शोध अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्या पार पाडतात.
याशिवाय आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, निक्षय आयडी, निवडणूक ड्युटी आणि एस.आर.सारख्या अतिरिक्त कामांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा दुवा म्हणून त्या सातत्याने योगदान देत आहेत.
७ ते १५ हजार रुपयांचे अनुदान
राज्यातील इतर महापालिकांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनाही प्रोत्साहनपर आर्थिक लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार स्थायी समितीमध्ये प्रत्येकी सात ते पंधरा हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याबाबत ठराव करण्यात आला आहे.
राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या वतीनेही या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे आता आशा स्वयंसेविकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरोग्यसेवेतील योगदानाला मिळणार आर्थिक सन्मान!…
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत तळागाळापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या योगदानाची दखल घेणारा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अधिकृत आदेशानंतर अनुदानाचे वितरण झाल्यास त्यांच्या कामाचा सन्मान होण्याबरोबरच आर्थिक आधारही मिळणार आहे.

















