- ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, आधुनिक व्यायामशाळेची होणार उभारणी..
- नगरसेविका अनिताताई संदीप काटेंनी मानले आ. शंकर जगताप यांचे आभार…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दिनांक : २० नोव्हेंबर २०२६ :- पिंपळे सौदागर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शंकर जगताप यांच्या निधीतून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य विरंगुळा केंद्र आणि गावठाण परिसरात सुसज्ज आधुनिक व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे.
नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्यामुळे या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
पत्रकात नगरसेविका काटे यांनी म्हटले आहे की, या निधीमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या केंद्रामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणि एकत्रित वेळ घालवण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच पिंपळे सौदागर गावठाण परिसरात सुसज्ज आणि आधुनिक व्यायामशाळा उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या व्यायामशाळेमुळे परिसरातील नागरिकांना व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आमदार शंकर जगताप यांच्या निधीतून मंजूर झालेल्या या विकासकामांमुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना नव्या सुविधा मिळणार आहेत. या कामांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी सांगीतले.

















