- पिंपरी-चिंचवडमधील चालक-मालकांचा शंभर टक्के सहभाग; डॉ. बाबा कांबळे यांचे आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२६) :- महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये पिंपरी-चिंचवडमधील सर्व चालकांनी सहभागी होऊन व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केले आहे.
अनधिकृत बाईक टॅक्सी, ॲप आधारित कंपन्यांचे धोरण आणि परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचारामुळे चालक-मालक आर्थिक संकटात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
बंदच्या दिवशी सकाळी १० वाजता पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे चालक एकत्र येतील. अभिवादनानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (RTO) मोर्चा काढण्यात येणार आहे.
अनधिकृत बाईक टॅक्सीवर बंदी, कल्याणकारी महामंडळासाठी निधी, ओला-उबरच्या भाड्याचे नियमन, परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था या प्रमुख मागण्या आहेत.
मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले आहे.

















